नांदेड जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा; पात्र रुग्णांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्यामार्फत ‘डॉ. आंबेडकर वैद्यकीय सहाय्यता योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून, विविध गंभीर आजारांसाठी मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.
महगड्या वैद्यकीय उपचारांचा खर्च परवडत नसलेल्या गरजू कुटुंबांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील पात्र रुग्णांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.
कोणाला मिळणार लाभ?
योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जात दाखला आणि उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागणार आहे.
गंभीर आजारांसाठी मिळणारी मदत
योजनेअंतर्गत आजारानुसार पुढीलप्रमाणे आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे—
- अवयव प्रत्यारोपण – ३ लाख ५० हजार रुपये
- किडनी शस्त्रक्रिया व डायलिसिस – ३ लाख ५० हजार रुपये
- कॅन्सर उपचार – २ लाख ५० हजार रुपये
- मेंदूची शस्त्रक्रिया – २ लाख रुपये
- इतर जीवघेणे गंभीर आजार – २ लाख रुपये
- हृदय शस्त्रक्रिया – १ लाख ५० हजार रुपये
- मणक्याची शस्त्रक्रिया – १ लाख ५० हजार रुपये
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी जात दाखला, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, मान्यताप्राप्त रुग्णालयाचे उपचाराचे अंदाजपत्रक, वैद्यकीय अहवाल, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे. बँक पासबुकची प्रत सादर करणे अनिवार्य आहे.
अर्ज कसा करावा?
योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतो. अर्ज पूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रे जोडावीत. त्यानंतर जिल्हाधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांच्या शिफारस पत्रासह अर्ज डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानच्या कार्यालयाकडे सादर करावा.
नांदेड जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र आणि गरजू रुग्णांनी योजनेची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा आणि महागड्या उपचारांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.




No comments: