खानदेशात केळीची आवक वाढली; निर्यातक्षम केळीला २२०० रुपयांपर्यंत दर
खानदेश : मागील पाच ते सात दिवसांपासून खानदेशात केळीच्या आवकेत वाढ झाली असून, सध्या दररोज सुमारे ८० ते ९० ट्रक केळीची आवक होत आहे. एका ट्रकची क्षमता सुमारे १६ टन आहे. जळगाव जिल्ह्यात केळी दर समितीकडून १५०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला जात आहे. मात्र, नैसर्गिक समस्यांमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
पक्व केळी लाल पडून खराब होणे तसेच अवेळी पिकण्याचे प्रकार वाढल्याने काही शेतकऱ्यांना केळी कमी दरात विकावी लागत आहे. सध्या बाजारात किमान ७०० ते ११०० रुपये प्रति क्विंटल, मध्यम दर्जाच्या केळीला १३०० ते १५०० रुपये, तर निर्यातक्षम केळीला १८०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
दरम्यान, जाहीर होणाऱ्या दरानुसार प्रत्यक्षात खानदेशात केळीची खरेदी होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. काही खरेदीदार शेतकऱ्यांची कोंडी करून दर पाडत असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे जाहीर दर आणि प्रत्यक्ष मिळणारा दर यामध्ये तफावत असल्याचे चित्र आहे.
कांदेबाग केळीची काढणी सुरू
सध्या कांदेबाग केळीची काढणी सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, जामनेर, यावल, चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा या भागांत केळीची काढणी सुरू आहे. दुसरीकडे रावेर आणि मुक्ताईनगर भागात केळीची आवक घटली आहे.
बऱ्हाणपुरात आवक घटली
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही केळीच्या आवकेत मोठी घट झाली आहे. सध्या तेथे दररोज १४८ ते १५२ ट्रक केळीची आवक होत असून, एका ट्रकची क्षमता १२ ते १६ टन आहे. बऱ्हाणपुरात केळीला सध्या १४०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
मागील महिन्यात बऱ्हाणपुरात दररोज २५० ते २६८ ट्रक केळीची आवक होत होती. आवकेत मोठी घट होऊनही केळीच्या दरात अपेक्षित वाढ झालेली नसल्याचे दिसून येत आहे.




No comments: