अंगदान महादान – हेच श्रेष्ठ जीवनदान; नांदेडमध्ये अवयवदान जनजागृतीसाठी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
📍नांदेड | प्रतिनिधी
'अंगदान जीवन संजीवनी अभियान-२०२६' अंतर्गत अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेड येथे बधिरीकरण विभागाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार (३० जुलै) रोजी झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अंगदानाचे सामाजिक, वैद्यकीय आणि मानवी महत्त्व प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. शीतल राठोड, डॉ. हुमेरा खान, डॉ. भावना भगत, डॉ. शिवानंद देवसरकर, डॉ. मोहन भंडारी यांच्यासह प्राध्यापक, नर्सिंग स्टाफ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. संजय मोरे, डॉ. प्रदीप बोडके आणि डॉ. समीर यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या निकालानुसार डॉ. युवराज बरसाळे यांनी प्रथम, कु. गौरी शिंदे यांनी द्वितीय, तर कु. रुचिका राठोड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. श्री. कन्हय्यालाल आणि कु. मानसी कुंभकर्ण यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी अवयवदानाबाबत समाजात व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. मेंदूमृत रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून दिल्यास अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. सचिन तोटावार आणि डॉ. नाझिमा मेमन यांनी विशेष योगदान दिले. आभार प्रदर्शन डॉ. मीनाक्षी चोले यांनी केले.
"अंगदान महादान – हेच श्रेष्ठ जीवनदान!" या प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.




No comments: