नांदेड : आठवीतील विद्यार्थिनी डॉ. विद्याश्री येमचे यांना इंटरनॅशनल डॉक्टरेट सन्मान; रिपब्लिकन गार्ड भवनात सत्कार
नांदेड : गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी डॉ. विद्याश्री शिवाजी येमचे हिने कला, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आणखी एक मानाचा सन्मान प्राप्त केला आहे. बिहार राज्यातील नालंदा विद्यापीठाने तिला इंटरनॅशनल डॉक्टरेट (Doctorate Honor) पदवी बहाल करून गौरविले आहे.
डॉ. विद्याश्री येमचे या 17 सामाजिक संस्थांच्या ब्रँड ambassador असून त्यांना आतापर्यंत 5,000 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड आणि बंजारा अशा विविध भाषांतील 75 लघुपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय 300 हून अधिक स्टेज शो, 2,000 पेक्षा अधिक रंगमंचीय सादरीकरणे, 36 जागतिक विक्रम, 4 आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके आणि एकूण 17 सुवर्णपदकांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी विविध कार्यक्रमांमधून मिळालेली मानधनाची रक्कम अनाथाश्रम, मतिमंद मुलांची संस्था आणि वृद्धाश्रमांना मदत म्हणून दिली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. आंबेडकर नगर, शिवाजी नगर, नांदेड येथील रिपब्लिकन गार्ड भवन येथे त्यांचा शाल, पुष्पगुच्छ तसेच भगवान बुद्ध आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे महाराष्ट्र प्रदेश संघटक विजय दादा सोनवणे, नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, शरद थडके, विद्यार्थिनीचे मार्गदर्शक भागवत सोनसळे, छायाचित्रकार शिवाजी गोडबोले तसेच सौ. राणी थडके यांची प्रमुख उपस्थिती होती.




No comments: