नांदेड | प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ए. के. संभाजी मंगल कार्यालय येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान' उत्साहात व नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात पार पडले.
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवा 'एकाच छताखाली, एकाच दिवशी' नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, पुरवठा, पंचायत समिती, भूमी अभिलेख, महावितरण, परिवहन, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), उमेद, सायबर सेल, भरोसा सेल, पशुसंवर्धन, जिल्हा उद्योग केंद्र, प्रधानमंत्री स्वनिधी योजना आदी विभागांनी सहभाग घेतला.
या शिबिराला ३,६५८ नागरिकांनी भेट देत जिवंत सातबारा, ईडब्ल्यूएस, उत्पन्न, जात, नॉन-क्रिमिलिअर, रहिवासी, भूमिहीन, महिला शेतकरी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले, रेशन कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, लेक लाडकी योजना, लखपती दीदी योजना, बचत गट कर्जवाटप, स्वामित्व योजना तसेच विविध कृषी योजनांचा लाभ घेतला.
यावेळी ९३२ पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला. तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी यांच्या सहकार्याने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात २,७५८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. रक्तदान शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या अभियानामुळे शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या असून नागरिकांच्या विविध समस्या तातडीने मार्गी लावण्यास मदत झाली.
कार्यक्रमास महापौर कविता मुळे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केल.




No comments: