महानगरपालिका प्रशासनाचे नागरिकांना सहभागाचे आवाहन
नांदेड,दि.११ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर, देशभरात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत "हर घर तिरंगा" अभियान अत्यंत उत्साहात राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून आणि राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' च्या १५० व्या वर्षानिमित्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने उद्या, १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ८:३० वाजता शहरातील शालेय विद्यार्थ्यांची एक भव्य आणि अभूतपूर्व 'तिरंगा रॅली' आयोजित करण्यात आली आहे. या भव्य रॅलीचे उद्घाटन महापौर सौ.कविता संतोष मुळे यांच्या हस्ते आणि मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून केले जाणार आहे.
या तिरंगा रॅलीचा प्रारंभ तिरंगा ध्वज परिसर, शासकीय तंत्रनिकेतन चौक येथुन सकाळी ८:३० वाजता होणार असुन रॅलीचा मार्ग: व्ही.आय.पी.रोड ➡️ आय.टी.आय. कॉर्नर ➡️ शिवाजी नगर ➡️ कलामंदिर ➡️ वजिराबाद चौक-महाविर चौक मार्गे रॅली पुढे मार्गस्थ होऊन शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे या रॅलीचा समारोप होईल. या देशप्रेमाच्या महाउत्सवात नांदेड शहरातील महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच खासगी व अनुदानित शाळांमधील हजारो विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, स्काऊट गाईडचे पथक आणि शिक्षक पूर्ण गणवेशात सहभागी होणार आहेत.
चौकट
मनपा आयुक्तांचे आवाहन
"तिरंगा हा आपल्या देशाचा स्वाभिमान असुन या रॅलीच्या माध्यमातून आपण नव्या पिढीमध्ये राष्ट्रभक्तीचे आणि देशसेवेचे संस्कार रुजवत आहोत. त्यामुळे नांदेडमधील सर्व व्यापारी, तरुण, महिला आणि नागरिकांनी उद्या सकाळी या रॅलीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा."
डॉ.महेशकुमार डोईफोडे,आयुक्त,
जनसंपर्क अधिकारी,
नां.वा.श.म.न.पा.नांदेड




No comments: