पत्र विहित मुदतीत बीएलओंकडे जमा करा; मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनर्निरक्षण (SIR) कामाचा आढावा; 72 टक्के प्रगती पूर्ण
नांदेड | प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कामांचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. बैठकीत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी मतदारांना भरलेले गणना पत्र विहित मुदतीत संबंधित बीएलओंकडे जमा करण्याचे आवाहन केले.
डॉ. खल्लाळ यांनी सांगितले की, मतदारसंघात आतापर्यंत 86 टक्के गणना पत्रांचे वितरण, 67 टक्के डिजिटायझेशन आणि एकूण 72 टक्के काम पूर्ण झाले आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, विहित मुदतीत गणना पत्र जमा करणाऱ्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जातील. मात्र, वेळेत गणना पत्र जमा न करणाऱ्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाहीत.
ज्या मतदारांची नावे Anomaly मध्ये आहेत किंवा 2002 च्या मतदार यादीत उपलब्ध नाहीत, त्यांनी घाबरून न जाता गणना पत्र भरावे. अशा प्रकरणांची 8 ऑगस्ट 2026 नंतर सुनावणी होईल आणि निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या 12 पुराव्यांपैकी कोणताही एक वैध पुरावा सादर करण्याची संधी दिली जाईल.
तसेच, 8 ऑगस्टनंतर नवीन मतदार नोंदणी मोहीम सुरू होणार असून नवमतदारांनी त्याचा लाभ घ्यावा. पत्त्यात बदल करावयाचा असल्यास प्रथम सध्याच्या पत्त्यावर गणना पत्र भरून जमा करावे, त्यानंतर फॉर्म क्रमांक 8 द्वारे पत्ता बदलाची प्रक्रिया करता येईल, असेही डॉ. खल्लाळ यांनी सांगितले.
बैठकीस सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार संजय वारकड, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा नायब तहसीलदार (निवडणूक) नितेशकुमार बोलोलु, नायब तहसीलदार संजय नागमवाड तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.




No comments: