राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी प्रस्ताव सादर करण्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
नांदेड (जिमाका), दि. २४ : राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या विविध अर्थसहाय्य योजनांसाठी प्रस्ताव सादर करण्यास ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी व असमान निधी योजनांची अंमलबजावणी ग्रंथालय संचालनालयामार्फत करण्यात येते. सन २०२६-२७ या वर्षासाठी या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना निर्धारित मुदतीत प्रस्ताव सादर करता येणार आहेत.
समान निधी अंतर्गत इमारत बांधकाम व विस्तारासाठी कमाल २५ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध आहे. या योजनेव्यतिरिक्त समान निधीतील इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येणार असल्याने त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करू नयेत, असे ग्रंथालय संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
असमान निधी अंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या ग्रंथालयांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर तसेच इमारत बांधकाम व विस्तारासाठी अर्थसहाय्य मिळणार आहे. फर्निचर खरेदीसाठी ४ लाख रुपये, इमारत बांधकामासाठी १० ते १५ लाख रुपये, ‘ज्ञान कोपरा’साठी २.५० लाख रुपये, विशेष आधुनिकीकरणासाठी २ लाख रुपये, महोत्सवी वर्षासाठी ६.२० लाख रुपये आणि इमारत विस्तारासाठी १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
तसेच राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रमांसाठी १.५० लाख, २.५० लाख व ३ लाख रुपयांपर्यंत, तर ‘बालकोपरा’ स्थापन करण्यासाठी कमाल ६.८० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध आहे.
योजनांचे नियम, अटी आणि अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत प्रस्ताव तयार करावा.
विहित नमुन्यातील प्रस्तावाच्या चार प्रती ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. यासोबतच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या ऑनलाइन प्रणालीद्वारेही प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.
Tag: Maharashtra Marathi News




No comments: