सामाजिक कार्याची दखल घेत धनाजी मनोहर जोशी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित
देगलूर | प्रतिनिधी
समाजातील वंचित, गरजू व गरीब नागरिकांसाठी सातत्याने सामाजिक कार्य करणारे तसेच जनतेच्या माध्यमातून समाजात जनजागृती घडवून आणणारे धनाजी मनोहर जोशी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.
दैनिक लोकसेवा वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राच्या विविध भागांत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. समाजातील गरजू घटकांसाठी निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याची दखल घेत धनाजी मनोहर जोशी यांची ‘समाजरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले होते. अशा परिस्थितीत जोशी यांनी गरजू व गरीब नागरिकांना आपल्या परीने मदतीचा हात दिला. संकटाच्या काळात माणुसकीची सेवा हीच खरी सामाजिक जबाबदारी मानून त्यांनी केलेले कार्य नागरिकांसाठी आधार ठरले. त्यांच्या या सेवाभावी कार्याची आजही परिसरात आवर्जून दखल घेतली जाते.
महाराष्ट्रातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. समाजातील प्रश्नांकडे केवळ पाहण्यापेक्षा ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्यक्ष पुढाकार घेण्याची त्यांची कार्यपद्धती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
या पुरस्कार सोहळ्याला दैनिक देगलूर टाइम्सचे संपादक गजानन जेळे, दैनिक चित्रलेखचे संपादक प्रभू वेंकटलावार, डॉ. गजानन पाटील मुंडेगावकर, आकाश पाटील इंद्रिकर, हेमाडपंथी हॉटेल नगरीचे माजी सरपंच शेखर सूर्यवंशी, पत्रकार गजानन शिंदे, भाजपचे सचिन कांबळे, वसंत दादा यांच्यासह सामाजिक, पत्रकारिता व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत धनाजी मनोहर जोशी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सामाजिक कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान देगलूर परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
जोशी यांनी समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची आपली धडपड यापुढेही सुरू ठेवणार असून, त्यांच्या कार्यातून नव्या पिढीतील युवकांना सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.




No comments: