किनवटमध्ये रेशीम कोष प्रशिक्षणास उत्साहात सुरुवात* जिल्हा रेशीम अधिकारी वडवळे यांनी केले उद्घाटन
*SBI RSETI, जिल्हा रेशीम कार्यालय व HIMWP-MH प्रकल्पाचा संयुक्त उपक्रम; 60 शेतकऱ्यांचे 10 दिवसाचे प्रशिक्षण बॅच सुरू*
नांदेड दि. ८ ऑगस्ट:- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यास रेशीम हब बनविण्याच्या केलेल्या आव्हानानुसार किनवट तालुक्यातील 35 शेतकरी यांनी रेशीम लागवड केली. त्यानुसार पीक विविधतेला चालना देत पीक पद्धतीत बदल करत शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी *SBI RSETI, जिल्हा रेशीम कार्यालय व HIMWP-MH प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने किनवट तालुक्यात 10 दिवसीय रेशीम कोष उत्पाद उद्यमी प्रशिक्षणास आज 8 ऑगस्ट रोजी सुरुवात करण्यात आली.*
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी दूर जावे लागू नये तसेच प्रत्यक्ष शेतावरच रेशीम व्यवसायाचे तांत्रिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने पिंपरफोडी येथील श्री. जमादार यांच्या शेतावर 60 शेतकऱ्यांचे प्रशिक्षण बॅच चे उद्घाटन जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे आणि एसबीआयचे संचालक कैलास जायभाये यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी SBI RSETI संचालक श्री. कैलास जायभाये, जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे, रेशीम प्रशिक्षक कांचन जाधव, RSETI प्रशिक्षक आशिष राऊत, रेशीम तंत्रज्ञान प्रशिक्षक शिवप्रसाद माळवदकर, RSETI समन्वयक सचिन गीते, HIMWP-MH प्रकल्पाचे टीम लीडर रवि उबाळे तसेच RAES शाखा किनवटची टीम व प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि उबाळे यांनी केले. आशिष राऊत यांनी प्रशिक्षणाची प्रस्तावना मांडली. यावेळी अशोक वडवळे यांनी रेशीम शेती, रेशीम कीटक संगोपन, कोष उत्पादन व व्यवसायाच्या विविध संधींबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना पटवून सांगितले की सध्याच्या काळामध्ये रेशीम शेती शिवाय दुसरा पर्याय नाही, बदलणारे हवामान आणि उत्पन्नामध्ये आलेली अनिश्चितता याला सक्षम पर्याय म्हणून आपण रेशीम शेती कडे वळावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले. SBI RSETI संचालक कैलास जायभाये यांनी RSETI च्या माध्यमातून उद्योजकता व कौशल्य विकासासाठी उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण व सुविधांची माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार संदीप बेलकर यांनी मानले.
उद्घाटनानंतर प्रशिक्षणाच्या नियोजित अभ्यासक्रमानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली. दिवसभराच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांचे मनोगत जाणून घेतले असता, शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचे कौतुक करत रेशीम व्यवसायाबाबत प्रत्यक्ष व तांत्रिक माहिती मिळत असल्याने भविष्यात रेशीम शेती सुरू करण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले.
*नांदेड जिल्ह्याची रेशीम हब म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी केलेल्या प्रयत्नांना किनवट तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, 60 शेतकऱ्यांच्या बॅचच्या माध्यमातून या उपक्रमाला आजपासून महत्त्वपूर्ण सुरुवात झाली आहे.* रेशीम व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती आणि शेतीमध्ये पीक विविधता निर्माण करण्यास निश्चितच मदत होणार आहे.
Tag: नांदेड बातम्या




No comments: