जलसंधारणाचा संदेश देत नांदेडमध्ये ‘वॉक फॉर वॉटर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड : जलसंधारण दिनानिमित्त माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी नांदेड येथे ‘वॉक फॉर वॉटर’ महावॉकथॉनचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शासकीय तंत्रनिकेतन मैदानापासून सुरू झालेल्या तीन किलोमीटरच्या महावॉकथॉनमध्ये लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार तसेच जलसंधारणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
‘माती वाचवा–पाणी वाचवा–सुरक्षित भविष्य घडवा’ या संदेशांनी परिसर दुमदुमून गेला. सहभागींच्या उत्साहामुळे जलसंधारणाबाबत जनजागृतीचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.
मृद व जलसंधारण विभागाच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाचा उद्देश जलसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे आणि नागरिकांमध्ये माती व पाण्याच्या संवर्धनाबाबत जागृती निर्माण करणे हा होता. या उपक्रमातून पाण्याचे महत्त्व आणि भविष्यातील जलसुरक्षेसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित झाली.





No comments: