पुणे, दि. 27 ऑगस्ट : जनगणना, BLO (Booth Level Officer) यांसारखी राष्ट्रीय कर्तव्ये बजावताना उन्हाळी व दिवाळी सुट्ट्यांमध्येही काम करणाऱ्या हजारो शिक्षकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. सुट्टीच्या काळात केलेल्या कामाबद्दल मिळणाऱ्या अर्जित रजेची (Earned Leave - EL) नोंद सेवा पुस्तकात (Service Book) करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट आदेश जारी केले आहेत.
शिक्षक महासंघ कोकण विभागाचे अध्यक्ष तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी
सदस्य अनिल बोरनारे यांनी हा प्रश्न सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. यासंदर्भात त्यांनी 11 मे 2026 रोजी शासनाकडे निवेदन सादर करून शिक्षकांना त्यांच्या हक्काची अर्जित रजा मिळावी, अशी मागणी केली होती.
या पाठपुराव्याला यश मिळत शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी 26 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृत आदेश काढला आहे. आदेशानुसार, महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी नियमावली 1980 मधील तरतुदीनुसार सुट्टीच्या कालावधीत शासनाच्या आदेशाने काम केल्यास संबंधित शिक्षकांना अर्जित रजा मंजूर होईल. तसेच त्या रजेची नोंद सेवा पुस्तकात करणे बंधनकारक राहणार आहे.
यामुळे जनगणना, मतदार यादी पुनरावलोकन, BLO कामकाज आणि इतर शासकीय जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या शिक्षकांना त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष कामाच्या दिवसांइतकी अर्जित रजा त्यांच्या EL खात्यात जमा होणार आहे.
दरम्यान, शिक्षकांनी आपल्या सेवा पुस्तकातील अर्जित रजेची नोंद तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या रजेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




No comments: