एकही पात्र मतदार वंचित राहू नये; एसआयआर मोहिमेची व्यापक जनजागृती करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; 30 सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 2 सप्टेंबर : जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी तसेच नागरिकांनी विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमेची व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
31 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 ऑक्टोबर 2026 हा अर्हता दिनांक निश्चित करून नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ही मतदार यादी तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये तसेच मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रारूप मतदार यादी आणि अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांची (ASDD) यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मतदारांनी आपले नाव व तपशील तपासावेत
प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव, वय, पत्ता आणि इतर तपशील अचूक आहेत का, याची प्रत्येक मतदाराने खात्री करावी. मतदारांना ऑनलाइन माध्यमातूनही आपले नाव तपासता येणार आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्राचे संकेतस्थळ तसेच Voter Helpline App चा वापर करता येईल.
तसेच 1950 या वोटर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून किंवा एसएमएसद्वारे मतदार यादीबाबत माहिती घेता येणार आहे.
30 सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करा
प्रारूप मतदार यादीबाबत 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. प्राप्त दावे-हरकतींवर सुनावणी व निपटारा 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत करण्यात येणार असून अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांनी नवमतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्या कामासाठी कोणता अर्ज?
- नमुना 6 — नवीन मतदार म्हणून नोंदणीसाठी
- नमुना 7 — मतदार यादीतील नावाला हरकत किंवा नाव वगळण्यासाठी
- नमुना 8 — नाव, वय, पत्ता आदी तपशीलात दुरुस्ती, अपंगत्वाचे चिन्हांकन किंवा मतदारसंघातील पत्ता स्थलांतरासाठी
- नमुना 6-अ — परदेशी भारतीय मतदारांच्या नोंदणीसाठी
पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले असल्यास किंवा यादीतील तपशीलात काही त्रुटी असल्यास संबंधित बीएलओ, मतदार नोंदणी अधिकारी किंवा उपलब्ध ऑनलाइन माध्यमातून 30 सप्टेंबरपूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
नोटीस मिळालेल्या मतदारांनी कागदपत्रे सोबत आणावीत
नाव, वय किंवा इतर तपशीलांतील विसंगती अथवा अनमॅपिंगबाबत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी सुनावणीच्या वेळी जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
यामध्ये जन्म प्रमाणपत्र, पारपत्र, मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र, कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, शासकीय अथवा सार्वजनिक उपक्रमांचे ओळखपत्र, निवृत्तीवेतन आदेश, कुटुंब नोंदवही, जमीन अथवा घर वाटप प्रमाणपत्र आदी कागदपत्रांचा समावेश आहे.
मतदार यादीच्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे, तर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करता येणार आहे.
दरम्यान, या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करावी आणि पात्र व्यक्तीचे नाव वगळले असल्यास निर्धारित मुदतीत दावे-हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.




No comments: