छतावर वडील, पायऱ्यांवर माय-लेकी अन् बेडखाली मुलगा; कुटुंबातील चौघांची हत्या
रंगपूर : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बंद घरामध्ये निवृत्त शिक्षक, त्यांची पत्नी, २३ वर्षीय मुलगी आणि १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आला. चौघांचीही गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या घटनेचा तपास पोलीस, सीआयडी आणि डिटेक्टिव्ह ब्रांचकडून संयुक्तपणे सुरू आहे.
‘द डेली स्टार’च्या वृत्तानुसार, रंगपूर शहरातील दासपारा (मछुआपारा) परिसरातील घरात शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हे मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये रंगपूर जिल्हा शाळेचे निवृत्त शिक्षक गणपती चक्रवर्ती (६५), त्यांची पत्नी प्रीतिलता चक्रवर्ती (५०), मुलगी आगामी चक्रवर्ती प्रार्थी (२३) आणि मुलगा प्रियम चक्रवर्ती (१२) यांचा समावेश आहे.
मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी
रंगपूर मेट्रोपोलिटन सीआयडीचे प्रभारी सुबीर चौधरी यांच्या माहितीनुसार, प्रीतिलता चक्रवर्ती आणि त्यांची मुलगी यांचे मृतदेह घरातील पायऱ्यांवर आढळले. गणपती चक्रवर्ती यांचा मृतदेह छतावर, तर १२ वर्षीय प्रियमचा मृतदेह बेडखाली सापडला. या प्रकारामुळे हत्येचे नेमके कारण आणि घटनाक्रमाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दोन दिवसांपासून मोबाईल बंद
नातेवाईकांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीपासून कुटुंबातील चौघांचेही मोबाईल फोन बंद येत होते. प्रीतिलता यांची धाकटी बहीण पूजा चक्रवर्ती यांनी गुरुवारी दुपारी त्यांच्याशी शेवटचे संभाषण झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर वारंवार फोन करूनही संपर्क होत नसल्याने शनिवारी रात्री नातेवाईक दासपारा येथील घरी पोहोचले.
घराचे मुख्य गेट बंद होते आणि घरातील दिवेही बंद होते. परिस्थिती संशयास्पद वाटल्याने नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता चौघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले.
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
गणपती चक्रवर्ती यांचे कोणाशीही वैर नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे या हत्याकांडामागे नेमके कारण काय आहे, हल्लेखोर कोण आहेत आणि हत्या कधी करण्यात आली, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून पुढील तपास पोलीस, सीआयडी आणि डिटेक्टिव्ह ब्रांचकडून केला जात आहे.
या घटनेमुळे रंगपूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, तपासातून हत्याकांडामागील नेमके सत्य समोर येण्याची प्रतीक्षा आहे.
Tag:




No comments: