नांदेड | प्रतिनिधी : कंधार येथील पंचायत समिती सभागृहात अति प्रभावित मेघा पाणलोट क्षेत्र संस्थेच्या पुढाकारातून रेशीम शेती विषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी विलास नरवटे होते. यावेळी जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे, गटविकास अधिकारी महेश पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे, प्रकल्प समन्वयक दिनेश खडसे, एसबीआय आरसेटीचे आशिष राऊत, अमर सूर्यवंशी, नरोजी कोरके तसेच मनरेगाचे अधिकारी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी विलास नरवटे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत रेशीम शेतीचा स्वीकार करून उत्पन्नात वाढ करण्याचे आवाहन केले.
जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पारंपरिक पिकांच्या तुलनेत रेशीम शेती अधिक फायदेशीर असून लागवडीचा खर्च कमी येतो. कमी किंवा जास्त पावसाचाही या शेतीवर तुलनेने कमी परिणाम होतो. सध्या रेशीम कोषाला प्रतिक्विंटल ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते.
त्यांनी पुढे सांगितले की, रेशीम शेतीमुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि तुतीच्या पानांचा उरलेला भाग सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयुक्त ठरतो. या व्यवसायात कुटुंबातील सर्व सदस्यांचा सहभाग वाढत असल्याने आर्थिक प्रगतीबरोबरच कौटुंबिक एकोपा आणि सामाजिक विश्वासही वाढतो. त्यामुळे "शेतात खत, घरात एकमत आणि गावात पत निर्माण करणारी रेशीम शेती" प्रत्येक शेतकऱ्याने स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश खडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.




No comments: