नांदेड, दि. २८ : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि ‘सेफर इंडियन रोड्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रोड सेफ्टी राखी-२०२६’ या अभिनव जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वझीराबाद सर्कल रोड, पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी वाहनचालक आणि नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे तसेच रस्त्यावरील इतर वापरकर्त्यांचा आदर करण्याचे आवाहन केले. जीवघेणे रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
बहुतांश जीवघेणे अपघात हे मानवी चुका आणि रस्ता सुरक्षेच्या नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे घडतात. त्यामुळे नागरिकांनी रस्ता सुरक्षेबाबतच्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या आपल्या कुटुंबीय आणि प्रियजनांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नका
पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास प्रोत्साहन देऊ नये. योग्य प्रशिक्षण आणि वैध वाहन परवाना मिळाल्यानंतरच वाहन चालविण्याची परवानगी द्यावी, असेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. तसेच पादचाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी पदपथांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
पदपथावरील अतिक्रमणांवर कारवाई
नांदेड शहर वाहतूक पोलीस महानगरपालिका प्रशासनाच्या समन्वयाने शहरातील पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करीत आहेत. वाहनचालक, पादचारी आणि सर्व नागरिकांसाठी शहरातील रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी नागरिकांनी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने रस्ता सुरक्षेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणारा ‘रोड सेफ्टी राखी-२०२६’ हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नांदेड शहर वाहतूक पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच ‘सेफर इंडियन रोड्स’च्या सदस्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमास वाहतूक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, ‘सेफर इंडियन रोड्स’चे सदस्य घनशाम ओझा, महेश तिवारी, सोनू उपाध्याय, अंबादास जोशी, तरुण तिवारी, सिमरन तिवारी, राजश्री अडबलवार, वरुण तिवारी, सय्यद जैद अली, नेताल तिवारी, सृष्टी उपाध्याय, राघव तिवारी यांच्यासह नांदेड शहर वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




No comments: