अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात नांदेडात आज महामोर्चा
नांदेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात नांदेड येथे आज, रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुसूचित जातीतील विविध समाजघटकांचे प्रतिनिधी या महामोर्चात सहभागी होणार आहेत.
राज्य सरकारने बदर समितीचा अहवाल अधिकृतपणे तातडीने सार्वजनिक करावा, तसेच जातीनिहाय जनगणना पूर्ण होईपर्यंत अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
अनुसूचित जातींच्या आरक्षणातील रिक्त पदांचा बॅकलॉग तातडीने भरण्यात यावा, आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या परीक्षार्थींना खुल्या संवर्गातील जागांवरही गुणवत्तेच्या आधारे संधी मिळावी, तसेच अनुसूचित जातींसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीतून इतरत्र वळविण्यात येणारा निधी थांबवावा, अशा विविध मागण्या महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
या महामोर्चात बुद्धिजीवी, आंबेडकरवादी, बौद्ध, मातंग, चर्मकार, वाल्मीकी, भंगी, बुरुड यांसह अनुसूचित जातीतील विविध ५९ जातींचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत शासनाने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात मोठ्या संख्येने समाजबांधवांनी महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




No comments: