डीजेमुक्त, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
शांतता, सौहार्द आणि सर्वधर्मसमभाव राखण्याचे आवाहन; कृत्रिम तलावांचा वापर करण्याच्या सूचना
नांदेड, दि. २ सप्टेंबर : गणेशोत्सव, दहीहंडी, पोळा तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. नांदेड जिल्ह्यात डीजेमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून वेगळा संदेश द्यावा, तसेच गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी आमदार अमर राजूरकर, महापौर कविता मुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, मनपा अपर आयुक्त गिरीश कदम, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह शांतता समितीचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नदीऐवजी कृत्रिम तलावात विसर्जन
गणेशोत्सव काळात कोणालाही त्रास होणार नाही, याची गणेश मंडळांनी दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले.
गणेशमूर्तींचे नदीच्या वाहत्या प्रवाहात विसर्जन न करता कृत्रिम तलावांचा वापर करावा. घरगुती गणेशमूर्तींचे घरोघरी संकलन करण्याबाबतही प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. उत्सव काळात नागरिक व गणेश मंडळांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिकाधिक कृत्रिम तलाव उभारण्याचे आवाहन
आमदार अमर राजूरकर यांनी शहरात अधिकाधिक कृत्रिम तलावांची निर्मिती करून डीजेमुक्त आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. महापौर कविता मुळे यांनी पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी इको-फ्रेंडली गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले.
नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये : पोलीस अधीक्षक
गणेशोत्सव शांततेत व सर्वधर्मसमभावाने पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सोशल मीडियावरील संदेश आणि पोस्टची सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले.
उत्सव काळात कोणतीही दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही नागरिकाने कायदा हातात घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई आणि आवश्यक नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
विसर्जनासाठी मनपाची तयारी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. मिरवणूक मार्गावरील अडचणी दूर करण्यासह विविध ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
निर्माल्य व प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, पथदिवे, विद्युत रोषणाई तसेच विसर्जनाच्या वेळी क्रेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मनपा अपर आयुक्त गिरीश कदम यांनी दिली.
बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी गणेशोत्सव व दहीहंडीच्या अनुषंगाने विविध सूचना व अडचणी मांडल्या. त्यावर योग्य नियोजन करून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी शांतता समितीचे सदस्य, सामाजिक नेते आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.




No comments: